इतिहास

पाली गावाचा इतिहास

पाली हे गाव उत्तर कोकणात सुधागड तालुका व रायगड जिल्ह्यात आहे. गणेश पुराणात ‘सिंधुदेशेऽति  विख्याता पल्लीनाम्नाऽ भवत्पुरी।।’ (अध्याय  २२-२३) व मुद्‌गल पुराणात ‘सिंधुदेशे समाख्याता पल्लीनाम्ना पुरी पुरा।।’ (आठवा खंड अध्याय  ३७ ते ३९) असे उल्लेख आढळतात. वरील दोन्ही उल्लेखांवरून सिंधु म्हणजे समुद्रापासून तयार झालेल्या देशामध्ये पल्ली नावाचे विख्यात नगर होते. पल्ली ह्या नावाचाच पुढे पाली हा अपभ्रंश झाला आहे. मुसलमानी आमदानीत पालीची ‘अमिनाबाद’ अशी ओळख होती. शिवकाळात मामले पाली हा सुभा चेऊलचा एक भाग होता.

पाली परिसराचा राजकीय इतिहास

इ.स. १७२६ अगोदर पालीचा सरसगड व त्याखालील मुलुख जंजीरेकर सिद्दी, म्हणजेच मोगल यांच्या ताब्यात होता. याच साली सर सेनानी कान्होजी आंग्रे यांनी जंजीरेकर सिद्दी बरोबर पालगड घेण्यासाठी युध्द केले. त्यांना १३ मे १७२९ मध्ये सिद्दी कडून पालगड घेण्यात यश मिळाले. इ .स १७३३ मध्ये जंजीरेकर सिद्दी व पेशवे यांच्यात तह झाला.या तहा पासून रायगड ,तळे ,घोसाळे, अवचितगड ,बिरवाडी हे ५ किल्ले व नागोठाणे, अष्टमीवशी, महाल पाली हे महाल दरोबास्त पेशवे यांनी घ्यावें जंजीरेकरांनी हरकत करू नये असे ठरले. पालीचा जो भाग जंजीरेकर सिद्दीकडे होता तो भाग या तहाने पेशव्यांकडे आला.

इ .स . १७३५ साली बाजीराव पेशवे मानाजी आंग्र्यांच्या साहाय्यास आले असता नवदरे अलिबाग येथे यांच्यात तह होऊन मामले पाल किल्ले सरसगड, मृगगड, राजमाचीं ,कोपनगड किल्याखालील महाल, चौंचल बारोटी व नसरापुर पोट तर्फ सुभा अंमल पेशवे यांचेकडे आला. अशा प्रकारे पालीचा सरसगड किल्ला व त्याखाली येणारा मामले पालीचा मुलुख पेशव्यांचा ताब्यात आला.

सरखेल संभाजी आंग्रे यांनी हिराकोट, सागरगड,चौल व थळचा कोट घेऊन कुलाब्याचे पाणी बंद केले तरी येऊन रक्षण केले पाहिजे असे पत्र श्रीमंत नानासाहेब व चिमाजीआप्पा यांना मानाजी आंग्रे यांनी पाठविले. त्या नुसार माहे मार्च व एप्रिल १७४० च्या सुमारास श्रीमंत चिमाजीआप्पा व बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे मानाजी आंग्रे याला सहाय्य करण्यास कोंकणात आले. त्या वेळेस या उभयतांचा १६ ते २३ मे १७४० मध्ये पालीला मुक्काम होता.

श्री बल्लाळेश्वर मंदिर जिर्णोद्धार

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक