श्री बल्लाळेश्वराची पौराणिक कथा

श्री बल्लाळेश्वराची पौराणिक कथा

गणेश पुराण व मुद्‌गल पुराणामध्ये उल्लेख केलेल्या पल्लीपूरम उर्फ पाली ह्या गावातील ही कथा आहे.

पल्लीपूर नगरात कल्याणशेट नावाचा एक वैश्य वाणी आपली पत्नी इंदुमतीसह राहत होता. बरेच वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नांव बल्लाळ असे ठेवण्यात आले.

जसा जसा बल्लाळ मोठा होऊ लागला तस तसें त्याचे चित देवभक्ति व ईश्वर चिंतनाकडे ओढले जाऊ लागले. त्याची गणेशभक्ती वाढू लागली. सर्व बालगोपाल मित्रांना घेऊन तो जंगलात जाई, एक पाषाण घेऊन ती गणपतीची मूर्ती समजून तिची मानसपूजा व भजन करीत असे. त्यामुळे सर्व बाळगोपाळांना घरी परत जाण्यास उशीर होऊ लागला. बालमित्रांच्या पालकांनी सर्व माहिती घेऊन घेऊन कल्याणशेठकडे तक्रार केली की, तुमचा बल्लाळ आमच्या मुलांना बिघडवत आहे. बल्लाळ अभ्यास नीट करत नसल्याने कल्याणशेठजी त्याचावर नाराज होतेच. ही तक्रार आल्यावर ते  संतापले. ते मुलांना बरोबर घेऊन बल्लाळ रानात जेथे जात असे तेथे गेले, त्यांनी बल्लाळाची पूजा उध्वस्त केली, तेथील मांडव मोडला, पाषाणाची ध्यानमूर्ती फेकून दिली. हे पाहून सर्व मुले घाबरली. परंतु भक्तिरसात व गणेशाच्या  ध्यानात मग्न असलेल्या बल्लाळास ह्याची काहीही जाणीव नव्हती, तो ध्यानातच मग्न होता. हे पाहून कल्याणशेठजी भयंकर संतापले. बल्लाळास रक्तबंबाळ होई पर्यंत काठीने झोडपले. बल्लाळ मूर्छित पडला. त्याच अवस्थेत बल्लाळास एका झाडास बांधले व म्हणाले, ‘‘बघू कोण तुझ्या मदतीला येतो ? तुझा गणेशच तुला सोडवेल व जेवू घालेल!” असे सांगून संतापाने ते निघून गेले.

निरागस बल्लाळ बराच वेळ मूर्छित अवस्थेत होता त्याला हळू हळू शुद्ध येऊ लागली. वेदनांनी सर्व शरीर ठणकत होते, परंतु त्याही स्थितीत त्याने गणेशाचा धावा सुरू केला.

हे गणेशा! हे दयानिधा!!
मी भक्त माझा भाव तव चरण कमलात।
माझा पिता जो अधम त्याने कर्म केले हे निर्मम।
म्हणोनी शासन करी त्यांस।
अनुपम भक्ती भंजनास झाले।

बल्लाळाचा धावा ऐकून श्रीगणेशांनी प्रसन्न होऊन बल्लाळास दर्शन दिले. श्रीगणेशांचे दर्शन होताच बल्लाळाची सर्व बंधने दूर झाली. रक्ताळलेले कोमल शरीर पूर्ववत झाले. बल्लाळास श्रीगणेशांनी आलिंगन दिले व वर दिला, ‘‘हे वत्सा! तू सर्व श्रेष्ठ भक्त आहेस, तुला आत्मज्ञान प्राप्त होईल, तू दीर्घायुषी  होशील, ज्याने  तुझी पूजा उध्वस्त केली तो जन्मोजन्मी दुःख व दारीद्रय भोगेल.

बल्लाळ श्रीगणेशाला म्हणाला, ‘‘हे देवाधिदेवा गणेशा! आपण ह्या ठिकाणी कायमचे वास्तव्य करून  येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण कराव्यात.” श्रीगणेश तथास्तु म्हणाले व “मीं येथेच राहीन, माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल . ‘बल्लाळ विनायक’ या नावाने कायमचे वास्तव करीन”.  असा आशिर्वाद देऊन श्री गणेश एका शिळेत अंतर्धान पावले. श्री गणेशाने ज्या शिळेत ईश्वर रूप धारण केले ती शिळा म्हणजे “श्री बल्लाळेश्वर”. मुद्‌गल पुराणात बल्लाळ विनायक या नावा शिवाय बल्लाळेश, बल्लाळनायक ,बल्लाळेश्वर अशा नावांचा उल्लेख आहे. पालीचा गणपती “बल्लाळेश्वर” नावाने प्रसिध्द आहे.

श्री धुंडीविनायक

वरील कथेत पाषाणाला गणेशाची मूर्ती समजून बल्लाळ पूजा-अर्चा करत असे, जी कल्याणशेठजींनी फेकून दिली ती मूर्ती म्हणजेच “श्री धुंडीविनायक”   ही  मूर्ती पश्चिमाभिमुख असून “श्री बल्लाळेश्वरच्या” दर्शनापूर्वी प्रथम “श्री धुंडीविनायकाचे” दर्शन घेण्याची प्रथा आहे.

इतर मुनीच्या तपाचे उल्लेख

मुद्‌गल पुराण खंड ८ अध्याय ३७ यात लोमेशऋषींच्या उपदेशाप्रमाणे जाजली मुनींनी श्री बल्लाळेशा जवळ म्हणजे बल्लाळ विनायकांजवळ दुग्धपान करून चार महिने चातुर्मास गणेश व्रत केले. व्रत समाप्त होताच श्री बल्लाळ विनायक जाजली मुनीस प्रसन झाले व त्यांना दर्शन दिले, असा उल्लेख आहे.  नंतर प्रत्येक वर्षी श्री बल्लाळ विनायकाजवळ जाजलीमुनी चातुर्मास व्रत करीत असत, असे वर्णन सदर अध्यायात आहे.

सदर चातुर्मास गणेश व्रताचा उपदेश जाजली मुनींनी  शृंगऋषीचे वडील विभांड तथा विभांडक मुनींना केला व त्यास श्रीबल्लाळ विनायकाचा कथाभाग सांगितला. (मुद्‌गल पुराण खंड ८ अध्याय ३७/३८/३९) विभांडक मुनींनी जाजली आश्रमात राहून श्री बल्लाळेश्वराप्रीत्यर्थ चातुर्मास व्रत केले व त्यांना कार्तिकी पोर्णिमेस श्री बल्लळ विनायकाने प्रसन्न होऊन दर्शन दिले असा उल्लेख सदर खंडातील ४० व्या अध्यायात आहे. श्रीमद्‌गणेश पुराणा मध्ये श्री बल्लाळ विनायकाची कथा विश्वामित्र ऋषींनी भीम राजांस  सांगितली  असा  उल्लेख आहे. (गणेश पुराण उपासना खंड अध्याय २२/२३ ) मुद्‌गल पुराण व श्री गणेश पुराण याचा कालखंड त्रेतायुगातील असावा, म्हणजेच “श्री बल्लाळेश्वर मंदिर” त्या काळापासुन असावे.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक