देवस्थानतर्फे करण्यात येणारे उत्सव

भाद्रपद व माघ चतुर्थी

श्री बल्लाळेश्वराचे भाद्रपद व माघ चतुर्थी असे दोन जन्मोत्सव साजरे होतात. दोन्ही उत्सव शु. प्रतिपदा  ते शु. पंचमी असे पाच दिवस होतात.

दोन्ही उत्सवाची सुरवात प्रतिपदेला पुण्याहवाचनाने होते. श्री बल्लाळेश्वरा समोर गायन, वादन, नृत्य, भजन इ .कला सादर केल्या जातात. रोज रात्री कीर्तन असते. चतुर्थीला सकाळी श्री जन्माचे कीर्तन होते. सायंकाळीं ग्राम प्रदक्षिणेसाठी पालखी निघते. पालखीसमोर नगारा वादन, बँड पथक, ढोलताशा पथक, स्थानिक व आजूबाजूच्या गावातील भजनी, वारकरी मंडळी व सेवेकरी असतात . या प्रदक्षिणेस पालखीला साधारपणे सात तासांचा वेळ लागतो. रात्री पालखी संपल्यावर चहापान व सेवेकऱ्यांना श्रीफळ प्रसाद देण्यात येतो.

महानैवेद्य

माघ चतुर्थीला पालखी प्रदक्षिणेनंतर श्रीस महानैवेद्य दाखविला जातो. तो पाहण्यास अनेक भाविक उपस्थीत असतात. पंचमीला सकाळी सर्व भाविकांना महाप्रसाद भोजन दिले जाते. पंचंमीस रात्री देवस्थानशी सलग्न असणाऱ्या श्री गणेश मंडळ पाली यांचेतर्फे लळितानिमित्य स्थानीक कलाकारांतर्फे नाटय प्रयोग सादर केला जातो . षष्ठीला पहाटे लळिताचे कीर्तन होऊन उत्सव संपन्न होतो.

याशिवाय श्री बल्लाळेश्वर मंदिरात सणावारी रात्री देवाचे जागरण, गोकुळाष्टमी, ऋषिपंचमीनिमित्य  खेळ इत्यादी कार्यक्रम होतात

श्रीधुंडीविनायक उत्सव

जेष्ठ शु. प्रतिपदा ते जेष्ठ शु. पंचमी असा पाच दिवस हा जन्मोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदेला पुण्याहवाचनाने सुरुवात होते. रोज किर्तन, चतुर्थीला जन्माख्यान, लळिता निमित्ताने स्थानीक कलाकार श्री गणेश मंडळ, पालीतर्फे विविध कला सादर करतात. पंचमीस महाप्रसाद व लळिताचे कीर्तन होऊन हा उत्सव संपन्न होतो.

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली © 2024.सर्व हक्क राखीव | निर्माणकर्ता सेटअपन्यू इन्फोटेक